नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्याचबरोबर प्रेस ऑफ इंडियाची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या एका इमारतीचे उद्घाटनही करणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या या सोहळ्यातून पंतप्रधान मोदी मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरेचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा इत्यादी नेते मंडळी उपस्थित राहतील. दरम्यान, पंतप्रधान मोदी सायंकाळी ७ वाजता इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.