नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत भाषण करताना राहुल गांधी यांचे थेट नाव न घेता त्यांना ‘बालबुद्धी’ असे चिडवले होते. त्यावरून बिथरलेल्या काँग्रेसने आता ‘बैलबुद्धी’ असा शब्द वापरून त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट करून त्यात मोदींच्या काही जुन्या अतार्किक विधानांचा दाखला देत, ‘तुम्हाला माहितीच आहे, बैलबुद्धी कोण?’ असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसमध्ये यावरून नवाच सामना रंगणार असून भाजपाने राहुल यांच्यावर ‘बालबुद्धी’ अशी टीका केल्यास त्याला काँग्रेसकडून त्याला ‘बैलबुद्धी’ असे प्रत्युत्तर मिळणार आहे.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींवर यथेच्छ टीका केली होती. ते म्हणाले होते की, काँग्रेस सध्या एका बालकाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. मला एक किस्सा आठवतो की, एक मुलगा 99 गुण मिळाले म्हणून खूश झाला आणि तो घमेंड दाखवू लागला. तो सगळ्यांना दाखवू लागला की, बघा, मला किती चांगले गुण मिळाले. लोकही त्याला 99 गुण मिळाल्याने शाबासकी देत होते. त्यानंतर शिक्षक आल्यावर म्हणाले की, कसले कौतुक चालले आहे? या मुलाला 100 पैकी नाही, तर 543 पैकी 99 गुण मिळाले आहेत. आता या बालबुद्धीला कोण सांगणार की, त्याने सलग तीन वेळा नापास होण्याचा रेकॉर्ड केला आहे. ही बालबुद्धी शिरजोर होते, तेव्हा सदनात काहीही करते. डोळे मारते, मिठी मारते. तिच्या बोलण्याचा आणि वर्तनाचा काही संबंध नसतो.
मोदींच्या या टिंगलटवाळीने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने त्यांना चोख उत्तर देण्यासाठी आता बैलबुद्धीचे हत्यार उपसले आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करून मोदी आतापर्यंत केलेल्या चमत्कारिक दाव्यांचा उदाहरण देऊन त्यांची बैलबुद्धी अशी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बैलबुद्धी वो है जो लंबी लंबी फेकता है. जो नाले से पाइप लगाके गॅससे चाय बनाता हो. जो फोटोजेनिक मेमरी की बात करता हो. आप जानते है, बैलबुद्धी कोन है?
बैलबुद्धीचे ’कारनामे’ सांगताना ते नाल्यातून गॅस काढतात, जगात कोरोना लशीचा शोध सुरू होता, तेव्हा ते थाळी वाजवायला सांगत होते. पुलावामानंतर बालकोट झाले, तेव्हा ते म्हणाले की, आकाशात ढग आल्याने भारतीय विमानांना पाकिस्तानी रडार भेदू शकले नाही. सुशिक्षितांना ते भजी तळायला सांगत होते, अशी अनेक वक्तव्यांचे उदाहरण दिले आहे. या पोस्ट काँग्रेसच्या अनेक अकाऊंटवरून व्हायरल केल्या जात आहेत. यापूर्वी राहुल आणि मोदी यांच्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये फेकू विरुद्ध पप्पू असा सामना रंगला होता. आता बालबुद्धी विरुद्ध बैलबुद्धी अशी एकमेकांना डिवचण्याची लढाई रंगणार, असे दिसत आहे.
‘बालबुद्धी’ असंसदीय शब्द
संसदेच्या सचिवालयाने असंसदीय शब्दांच्या दिलेल्या या यादीत बालबुद्धीही शब्दाचाही समावेश आहे. हा शब्द लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकला जाईल, असेही म्हटले आहे. तरीही पंतप्रधानांनी हा शब्द वापरून राहुल गांधींवर टीका केली.