लखनौ
उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीकडे जात होती. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २० जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे.
उन्नाव पोलीस ठाण्याच्या बेहता मुजावर क्षेत्रांतर्गत ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच बेहता मुजावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथे उपचारासाठी दाखल केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.