गोवा – मुसळधार पाऊस पडत असल्याने कोकण रेल्वेच्या कारवार रिजनमधील गोव्याच्या हद्दीत रेल्वे बोगद्यातून पाणी साचले आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या १३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे कोकण रेल्वे बंद झाली असताना मुंबई-गोवा महामार्गही ११ ते १३ जुलै दरम्यान बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई गोवा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
कोकण रेल्वेच्या मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वे बोगद्यात ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाणी साचले. यानंतर या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या. मंगळवारी रात्री ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र आज पुन्हा पहाटेपासून पावसाने जोर धरल्याने पेडणे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील मांडवी, तेजस, दिवा, मंगळूर यासह १३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्या मार्गावरच अडकल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द झाल्याने स्थानकांवर प्रवशांची मोठी गर्दी झाली. स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाकडून विशेष बस चालवण्यात आल्या.
मुंबई गोवा महामार्गावर कोलाडजवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ५ गर्डर टाकण्यात येणार आहे. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस गर्डर टाकले जाणार आहे. त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांना वाकण-पाली मार्गे माणगाव असा प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.