जम्मू – जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर केलेल्या भ्याड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. हे पाचही जवान गडवाल रेजिमेंटचे होते. त्यातील एक आदर्श नेगी हा जवान होता . आदर्श नेगी यांचा सख्खा चुलत भाऊ दोन महिन्यांपूर्वी कर्तव्यावर असताना मरण पावला. म्हणजे अवघ्या दोन महिन्यांत नेगी कुटुंबाने दोन पुत्र गमावले. आदर्श नेगी यांचे काका बलवंत सिंह नेगी यांनी ही ह्रदयद्रावक कहाणी सांगितली.आदर्श यांचे सख्खे चुलत बंधू मेजर प्रणय नेगी (३३) यांचा ३० एप्रिल रोजी लेहमध्ये कडाक्याच्या थंडीत कर्तव्यावर असताना अल्पशा आजाराने मृत्यू झाला .
मूळचे उत्तराखंडच्या टिहरी गढवालच्या थट्टी दागर नावाच्या खेडेगावातील आदर्श नेगी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेतून पदवी मिळविण्यासाठी श्रीनगरला गेले होते. मात्र दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून ते २०१८ साली लष्कराच्या सेवेत दाखल झाले होते. अवघ्या सहा वर्षांच्या लष्करी सेवेत ते शहीद झाले.