नाशिक जिल्हयातील सिन्नरमध्ये कोट्यवधींच्या रस्त्याची अवघ्या महिन्याभरात दुरवस्था झाली आहे. अजून फारसा पाऊसझालेला नाही असे असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला रास्ता महिनाभरात उखडला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वावी ते शहा रस्त्यावर महिनाभरात जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावरील डांबराचा थर हाताने निघत आहे. वावी ते शहा रस्ता हा गेल्या ३० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नुकतेच करण्यात आले होते.
वावी ते शहा या रस्त्यासाठी तब्ब्ल ६ कोटी ४१ रुपये खर्च करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यानंतर लगेचच रस्त्याची दुरवस्था पाहायला मिळत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शहा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाल्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. रस्त्याचे काम करणाऱ्या बांधकाम विभाग आणि ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.