कोल्हापूर – दख्खनचा राजा जोतिबा देवाची मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्या रविवार ७ जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार दिवस सुरू राहणार आहे.त्यामुळे गुरुवार ११ जुलैपर्यंत जोतिबा देवाच्या मुख्य मुर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थानचे धैर्यशील तिवले यांनी याबाबत माहिती दिली.
पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचे संवर्धन ७ ते ११ जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना मुख्य मुर्तीचे दर्शन घेता येणार नाही. या कालावधीत भाविकांना उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.
जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागास कळविले होते.पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली.मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग, पुणे यांनी अहवाल दिला आहे.त्यानुसार मुर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे.