पुणे
पुणे शहरात आतापर्यंत झिका व्हायरसचे सात रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने गर्भवती महिलांच्या तपासणीवर भर दिला आहे. शहरातील एरंडवणे, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी परिसरात झिका संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरातील ४१ गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.
एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती आहेत. त्यातील १४ गर्भवतींचे रक्ताचे नमुने मुंढवा परिसरातील , ६० पैकी १८ गर्भवतींचे रक्ताचे नमुने डहाणूकर कॉलनी परिसरातील होते. ३५१ पैकी ९ गर्भवतींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. आरोग्य विभागाने या गर्भवतींसह एकूण ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवविले आहेत. त्यातील सुमारे २५ जणांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामुळे अद्याप सुमारे ४० जणांचे तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. यात २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. या प्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावून, त्यांच्याकडून ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.