अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि इतर काही देवी-देवतांच्या मूर्तींचा त्यामध्ये समावेश असणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर या मूर्ती बसविल्या जाणार आहेत.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली.
चंपत राय यांनी सांगितले की या नवीन २५ मूर्तीसोबत रामचरित मानसचे लेखक गोस्वामी तुलसीदास यांची मोठी मूर्तीही बसवण्यात येणार आहे . मात्र त्यांचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही.
राम मंदिर २२१ फूट उंच असणार आहे. मंदिराचे मुख्य शिखर १६१ फूट उंच असेल. त्यावर ५० मीटर उंच ध्वजस्तंभ असेल. हा दंड गुजरातमधून तीन महिन्यांपूर्वी अयोध्येत आणण्यात आला होता. डिसेंबर २०२४ पर्यंत राम मंदिर पूर्ण तयार करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहणार आहे. या संपूर्ण मंदिर संकुलाचे बांधकाम पुढील वर्षी म्हणजे २०२५ च्या अखेरीस पूर्ण केले जाणार आहे.सध्या राम मंदिराचे उर्वरित काम वेगाने सुरू आहे.या बांधकामात आतापर्यंत तीन लाख घनफूट दगड वापरण्यात आला आहे. सुमारे १.२५ लाख घनफूट दगड अद्याप टाकण्यात येणार आहेत. काल झालेल्या इमारत बांधकाम समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.