मुंबई – तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील सदस्यांची मुंबईत अभूतपूर्व मिरवणूक काढून वानखडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. यासाठी मरीनलाईन परिसरात क्रिकेट प्रेमींनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीत अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीत सुमारे १२ मुले बेपत्ता झाली तर नऊ जण गर्दीत श्वास कोंडल्याने बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्यक्रम संपल्यावर क्रिकेट रसिक घरी परतल्यावर रस्त्यावर चपलांचा खच पडला होता.
मरिन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत अनेकांची ओढाताण झाली. अनेकांना धक्काबुक्की झाली. अनेकांना गर्दीत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. एका तरुणीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर पोलिसाने तिला खांद्यावर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यापैकी नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.