पाटण – तालुक्यातील मोरणा नदीवर गुरेघर येथे बांधलेल्या धरणाच्या परिसरात गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला.त्यामुळे हे गुरेघर धरण ६५ टक्के भरले आहे. या धरणातून नदीपात्रात १३१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी मोरणा नदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मोरणा-गुरेघर धरणाच्या सांडव्यावरून ११३१ व वीजग्रहातून १८७ असा एकूण १३१८ क्युसेक पाण्याचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मोरणा नदीकाठी असलेल्या धावडे,वाडी कोतावडे, मोरगिरी आणि बेलवडे आदी गावांना धरण प्रकल्पाच्या अधिकार्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.मोरणा भागात झालेल्या पावसामुळे परिसरातील ओढ्याना देखील मोठे पाणी आले आहे. बुधवारी एका दिवसात या भागात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास सांडव्यावरून अधिक पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.