मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या कामासाठी जागतिक पातळीवरील विख्यात परदेशी कंपन्यांची नेमणूक केली आहे.या कंपन्यांकडून तयार केल्या जाणार्या ‘मास्टर प्लॅन’ चे काम आता अंतिम टप्प्यात आहे.हे काम पूर्ण होताच धारावीत एक सॅम्पल फ्लॅट उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात एकीकडे बायोमेट्रिक सर्व्हे तर दुसरीकडे ‘मास्टर प्लॅन ‘ अशी दोन्ही कामे सुरू आहेत.यातील ‘मास्टर प्लॅन’ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे.धारावीचा हा ‘मास्टर प्लॅन’ लवकरच केला जाणार असल्याची माहिती धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या प्लॅनमध्ये फ्लॅटची बांधणी आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. हा मास्टर प्लॅन धारावीतील नागरिकांच्या माहितीसाठी जागोजागी लावला जाणार आहे. धारावीतच सॅम्पल फ्लॅटची उभारणी केली जाणार आहे.