संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! रंगभूमी गाजवणारे योगेश सोमण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रंगभूमीवरील आघाडीचे नाटककार दिग्दर्शक व रंगकर्मी योगेश सोमण यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ४ जून १९६६ पुणे येथे झाला. योगेश सोमण हे नाव महाराष्ट्रातील कला रसिकांना माहिती नसेल, असे विरळाच.

हरहुन्नरी, प्रथितयश नाट्यदिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते असलेले सोमण हे मागील २५ हून अधिक वर्षांपासून रंगभूमीची अविरत सेवा करत आहेत. यासोबतच एक प्रभावी वक्ता, नाट्यशिक्षक आणि विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखठोक भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात या व्यक्तिमत्त्वाचं नाव गाजतंय. योगेश सोमण हे मागील २५ वर्षांपासून मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. मराठी, हिंदी चित्रपट तसेच नाटकात त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

योगेश सोमण पुण्याचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आज त्यांची प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळख असली तरी, नाटक हा त्यांचा लहानपणापासूनच पिंड नव्हता. लहानपणी त्यांना हॉकी आणि बॅडमिंटनची आवड होती. त्यात त्यांनी नैपुण्यही मिळवले होते आणि याच जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही बॅडमिंटन मध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटवला. दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. १९८७ साली डिप्लोमा झाल्यानंतर सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने पुण्यात ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि नाटक’ या कार्यशाळेत सहभाग घेतला. ही कार्यशाळा अवघ्या पंधरा दिवसांची होती. मात्र, या कार्यशाळेने त्यांचे अवघे जीवनच बदलून टाकले. या कार्यशाळेत त्यांची ओळख प्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी झाली.

योगेश सोमणसारखा चुणचुणीत आणि प्रतिभावंत मुलगा त्यांच्या नजरेतून सुटला नाही. प्रकाश पारखी यांच्या मार्गदर्शनानंतर आपण नाटक लिहू शकतो, सर्वांना पटतील असे विषय आपल्याला सुचतात, ते बसवू शकतो याची जाणीव त्यांना झाली. या पंधरा दिवसांत त्यांची नाटकाशी तोंडओळख झाली. बॅडमिंटन आणि हॉकी खेळापेक्षा माझ्या भावभावनांना जास्त महत्त्व आहे, मला जे करायचंय, मांडायचंय, बोलायचंय ते मी इतर कोणत्याही क्षेत्रात मांडू शकत नाही. यासाठी एकमेव क्षेत्र म्हणजे, नाटक! याच ठिकाणी मी व्यक्त होऊ शकतो, याची जाणीव त्यांना झाली आणि यानंतर तन-मन-धनाने आयुष्यभर रंगभूमीच्या सेवेचा त्यांनी निश्चय केला. कार्यशाळा संपल्यानंतर यातील काही मित्रांसोबत त्यांनी ‘स्नेह’ ही संस्था सुरू केली. ‘स्नेह’मार्फत त्यांच्या ग्रुपने वेगवेगळ्या एकांकिका सादर करायला सुरुवात केली. या एकांकिका लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असायची. या एकांकिका सादर केल्यानंतर जसजशी त्यांना बक्षिसे मिळत गेली, तसतसे आपण अधिक चांगलं लिहू शकतो, याची जाणीव त्यांना होत गेली आणि एक एक टप्पा पार करत त्यांच्या लेखणीला अनुभवाची धार मिळाली.

प्रत्येक रंगकर्मीच्या कारकिर्दीत ‘पुरुषोत्तम करंडक’चा टप्पा येतोच आणि असाच टप्पा त्यांच्याही आयुष्यात आला. आता या स्पर्धेत उतरायचे तर महाविद्यालयीन विद्यार्थी असणं ही एक अट होतीच. म्हणून मग सोमण यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. नाट्य कार्यशाळेनंतरचा ‘पुरुषोत्तम’ हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. या स्पर्धेत त्यांना लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तीनही विभागात सर्वोत्कृष्ट पारितोषिकं मिळाली. ‘पुरुषोत्तम करंडक’ची १९९१ व १९९२ अशी लागोपाठ दोन वर्षं त्यांनी गाजवली. यानंतर नाट्यक्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. ‘पुरुषोत्तम’च्या यशानंतर पंडित सत्यदेव दुबेंशी सोमण यांचा परिचय झाला. नाटक करण्याची ऊर्जा, अस्वस्थता दुबेंकडूनच मिळाल्याचे सोमण सांगतात. त्यांना ‘गुरू’ मानून त्यांनी नाटक, लेखन, नाटकाचे प्रयोग, एकपात्री प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यांच्या व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली ते ‘केस नंबर ९९,’ ‘रंग्या रंगिला रे,’ ‘आता कसं वाटतंय’ या नाटकांनी. यानंतर त्यांच्या ‘चाणक्य विश्वगुप्ता’ या व्यावसायिक नाटकाला राज्य नाट्य पुरस्कार मिळाला. या दरम्यानच्या काळात मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला. यासोबतच ‘अनादि मी अवध्य मी,’ ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांनीदेखील मोठे यश मिळविले. त्यांनी लिहिलेला ‘माझा भिरभिरा’ हा चित्रपट ४८ व्या आय.एफ.एफ.आय व २० व्या आंतराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला.

सहजच नाटकाशी ओळख झालेल्या या रंगकर्मीने आजतागायत मागे वळून पाहिले नाही. आपल्या २७ वर्षांच्या कारकिर्दीत नाटक, मालिका, एकपात्री प्रयोग आणि चित्रपटक्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अलीकडच्या काळात त्यांनी, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक,’ ‘आनंदी गोपाळ,’ ‘आसूड,’ ‘माणुसकी,’ ‘दृश्यम,’ ‘फास्टर फेणे’ अशा अनेक मराठी-हिंदी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. एवढंच नाही तर शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून ते आजही अनेक ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. नुकतीच त्यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. यासोबतच ते ‘हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजराथ विद्यापीठा’च्याही नाट्यशास्त्र विभागाचे परीक्षक आणि पेपर सेटर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी आतापर्यंत तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. नव्याने नाट्यक्षेत्रात प्रवेश करु इच्छिणाऱ्या उमद्या कलाकारांसाठी त्यांची ‘स्नेह अकादमी’ नेहमीच खुली असते. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, पु.ल.देशपांडे कला अकॅडमीच्या सल्लागार मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आहेत. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयासाठी त्यांनी २००६ व २०१७ साली खानापूर व २०१८ साली कुडाळ या ठिकाणी निवासी कार्यशाळा घेतल्या होत्या. नुकतीच त्यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. योगेश सोमण यांच्या पत्नी माधवी यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकाही साकारल्या आहेत. पुण्यातील अभिनव विद्यालय तसेच गरवारे कॉलेज मधून माधवी यांनी आपले शिक्षण घेतले. राधा ही बावरी या झी वाहिनीच्या मालिकेत त्या झळकल्या. सिद्धांत, शाळा, पितृऋण, स्लॅमबुक सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. पुण्यात गणेश फेस्टिवल मध्ये त्या दरवर्षी ढोलपथकात सहभागी होताना दिसतात. अस्सल मराठमोळ्या पोशाखात पुण्यात बरेच मराठी कलाकार ह्यात सहभागी होतात. योगेश आणि माधवी सोमण यांना ऋग्वेद नावाचा मुलगा आहे. ऋग्वेदला देखील अभिनयाची आवड आहे. अनेक नाटकांच्या स्पर्धेत तो नेहमीच सक्रिय सहभाग दर्शवतो.
योगेश सोमण यांची आजपर्यंतची कारकीर्द.

नाटक : ‘जन्मठेप,’ ‘आता कसा वाटतंय?’ ‘केस नंबर ९९,’ ‘रंग्या रंगिला रे,’ ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘श्री गोपाळ कृष्ण,’ ‘चाणक्य विष्णुगुप्ता,’ ‘सोंगटी,’ ‘राजा शिवबा,’ ‘आम्ही निमित्तमात्र,’ ‘अचानक,’ ‘दिली सुपारी बायकोची,’ ‘सुपारी,’ ‘आनंदडोह,’ ‘स्त्रीसूक्त,’ ‘एकदा पाहावा न करून,’ ‘नकळत दिसले सारे,’ ‘मी विनायक दामोदर सावरकर,’ ‘श्यामपात’.
मालिका : ‘स्पेशल ५,’ ‘अंजली,’ ‘क्राईम पेट्रोल,’ ‘नांदा सौख्यभरे,’ ‘मेहंदीच्या पानावर,’ ‘अनोळखी दिशा,’ ‘फू बाई फू,’ ‘दिल्या घरी तू सुखी राहा,’ ‘कथाकथी,’ ‘चेकमेट,’ ‘काळा वजीर पांढरा राजा,’ ‘पेशवाई,’ ‘रेशीमगाठी,’ ‘घरकुल,’ ‘ग्राहकांशी हितगुज,’ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’
चित्रपट : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक,’ ‘माझा भिरभिरा,’ ‘मांजा,’ ‘ये रे ये रे पैसा,’ ‘रमा माधव,’ ‘आता गं बया,’ ‘आनंदी गोपाळ,’ ‘आसूड,’ ‘माणुसकी,’ ‘दृश्यम,’ ‘फास्टर फेणे,’ ‘दांडगी मुले,’ ‘बेलगाम,’ ‘अचानक,’ ‘वीर सावरकर’
लघुपट व माहितीपट : ‘ज्योती,’ ‘अपनी’ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘इतिहास रंगभूमीचा’ या कार्यक्रमांतर्गत 3० माहितीपट निर्मिती व दिग्दर्शन.
पुस्तके : ‘६३ एक अंकी नाटके,’ ‘७ दोन अंकी नाटके,’ ‘२० एकपात्री नाटके’ (गुजराती आणि हिंदी भाषेत भाषांतरे), ‘आनंदडोह,’ ‘स्त्रीसूक्त आणि परशुराम,’ ‘नकळत दिसले सारे,’ ‘एकदा काय झालं सांगू?’

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami