‘भारतीय व्यवहार कोश‘ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ नरवणे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२४ रत्नागिरीजवळच्या नाखरे येथे झाला.
भारतीय भाषांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची उपासना करणारे कोशकार आणि राष्ट्रनिष्ठ कवी अशी विश्वनाथ नरवणे यांची ओळख होती. नरवणे यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामासाठी गुजरातला गेल्यावर बडोदा येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दादरा नगर हवेली मुक्ती लढ्यातही त्यांचा सहभाग होता. भाषाविषयाच्या प्रेमातून त्यांनी पंधरा भारतीय भाषांचा अभ्यास केला. त्यातूनच पुढे पंधरा भारतीय भाषा व इंग्रजी भाषा यांमधील व्यवहारात उपयोगी येणाऱ्या समानार्थी शब्द देवनागरी लिपीमध्ये देण्यासाठी भारतीय व्यवहार कोशची निर्मिती केली. त्यानंतर या सोळा भाषांमधील म्हणींचा अभ्यास करून भारतीय कहावत संग्रह या तीन खंडांतील संदर्भग्रंथाची रचना केली. त्यामध्ये विषयावर सर्व भाषांमधील समानार्थी म्हणी हिंदी-इंग्रजी अनुवादासह देण्यात आलेल्या आहेत. या दोन कोशांमुळे त्यांचा कोशकार म्हणून गौरव झाला.
इतर भाषांतील साहित्याचा परिचय करून देण्यासाठी त्यांनी काव्यनायक शिवाजी, भारतीय महिला कवयित्री, लाशित बडफुकन (आसामचा शिवाजी) हे संशोधनपर लेख लिहिले. उर्दू भाषेतील शेरांचे आणि गझलांचे समवृत्तात अनुवाद केलेले शेष सुंदर हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. नरवणे यांना राष्ट्रपतिपदक, उत्तर प्रदेशचा सौदार्द सन्मान, महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी एकता पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य परिषदेचा पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले होते. भारतातील जवळजवळ सर्व भाषांचे सखोल अध्ययन करून आपल्या कोशांद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधणारे विश्वनाथ नरवणे हे महापंडित होते. वाचन, अध्ययन, संशोधन आणि त्याची मांडणी यांत जीवन व्यतीत करणारे नरवणे यांनी पंधरा भारतीय आणि इंग्रजी अशा सोळा भाषांतील समानार्थी शब्दांचा बनविलेला भारतीय व्यवहार कोश ही राष्ट्रीय साहित्यातील एक लक्षणीय कृती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या सारख्या उच्चपदस्थांना त्यांच्याशी गप्पागोष्टी करताना कार्यालयीन कर्तव्यांचाही विसर पडला होता. नरवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, हे माहीत असूनही एस. एम. एस. नंबुद्रिपाद यांच्यासारख्या कम्युनिस्ट नेत्याने त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह जोडला होता तो त्यांच्या भाषा समृद्धीमुळे व्यासंग म्हणजे केवळ ग्रंथवाचन नव्हे, याची जाणीव ठेवून नरवणे यांनी प्रत्येक प्रांतातील बारकावे तेथे जाऊन आत्मसात केले. बहुभाषी भारतातील जनतेला जोडण्यासाठी भाषा हे अडथळे न ठरता त्यांचे पूल बनवावेत, या ध्येयासाठी ते सतत कार्य करीत राहिले. सर्व स्तरांतील मानसन्मान मिळूनही ते विनम्र राहिले. विश्वनाथ नरवणे यांचे ८ मे २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३