जम्मू – निसर्गसौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरला मागील 70-75 वर्षांत तीन खानदानांनी लुटले आहे. या तीन कुटुंबांनी केवळ आपल्या मुलांचे भले केले. तुमच्या मुलांना पुढे येऊ दिले नाही. अशा लुटारूंच्या हाती सत्ता देऊ नका. त्यांच्या विरोधात लढा,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरच्या जनतेला केले. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मोदींची पहिली सभा आज जम्मूच्या डोडा जिल्ह्यात झाली. मागील तब्बल 45 वर्षांनंतर काश्मीरच्या डोडामध्ये झालेली देशाच्या पंतप्रधानांची ही पहिली सभा ठरली.
देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काश्मीर परकीय शक्तींच्या निशाण्यावर आले. त्यानंतर घराणेशाहीने हे राज्य पोखरायला सुरुवात केली. काँग्रेस, पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्स ही तीन घराणी अनेक दशकांपासून काश्मीरची लूट करीत आली आहेत. त्यांनी केवळ
स्वतःचा स्वार्थ पाहिला. स्वतःच्या मुलाबाळांचे कल्याण केले. सर्वसामान्य जनतेकडे त्यांनी नेहमी दुर्लक्ष केले. गोरगरीबांच्या मुलांना कधीही पुढे येऊ दिले नाही. सरकारी नोकर्यादेखील या तीन कुटुंबाशी संबंधित लोकांनाच मिळत गेल्या. त्यामुळे क्षमता असूनही येथील सर्वसामान्य तरुण वर्षानुवर्षे बेरोजगारीच्या झळा सोसत राहिला.जनतेची दिशाभूल करीत स्वतः मौज मारण्यातच या कुटुंबांनी धन्यता मानली, अशी टीका मोदी यांनी केली.
2000 पासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नव्हत्या. 2014 साली आम्ही त्या घेतल्या. स्थानिकांना उमेदवारी दिली. त्यातून 30-35 हजार तरुणांचे नवे नेतृत्व उदयास आले. उज्वल भविष्याची स्वप्ने उरी बाळगून राजकारणात आलेल्या या तरुणांमुळे विकासाचे नवे युग सुरु झाले. आताची विधानसभा निवडणूक ही काश्मीरचे दशकानुदशके शोषण करणारी तीन घराणी विरुद्ध 30-35 हजार स्थानिक नौजवान अशी होणार आहे. एका बाजुला लुटणारी तीन घराणी आणि दुसर्या बाजुला विकासाची स्वप्न पाहणारे नौजवान अशी ही लढाई आहे. या लढाईत कोणाची साथ द्यायची याचा विचार तुम्हाला करायचा आहे. काश्मीरचे खरे शत्रू असलेल्या या घराण्यांच्या हाती सूत्र दिली तर ते 370 कलम पुन्हा लागू करतील, तुमचे आरक्षण हिसकावून घेतील, तीन तलाकसारख्या कुप्रथांना पाठबळ देतील. अशा स्वार्थी लोकांपासून सावध रहा, असे मोदी म्हणाले.
दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, राज्यात दहशतवाद्यांना आणि फुटीरतावाद्यांना याच तीन घराण्यांनी पोसले. एक काळ असा होता की देशाचे गृहमंत्रीदेखील काश्मीरच्या लालचौकात यायला घाबरत होते. सायंकाळ झाली की सर्वत्र अघोषित संचारबंदी असायची. दुकाने, बाजार बंद असायचे. पण आता तसे चित्र दिसत नाही. आता खोर्यातील दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे. मागील दहा वर्षात जम्मूचे रुप पालटले आहे. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत किती लोकांचे आजवर बळी गेले यावर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याप्रसंगी मोदींनी काश्मीरच्या जनतेला विकासाचे स्वप्नही दाखविले. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मागील पाच-सहा वर्षांत आम्ही अनेक शाळा -महाविद्यालये सुरू केली. यापूर्वी तुम्हाला एक एक शाळा सुरू करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. आंदोलने करावी लागत होती. पण आम्ही डोडामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून तरुणांच्या मनातील मोठे स्वप्न पूर्ण केले.राज्याची सूत्रे आपल्या हाती आली तर विकासाचा वेग याहून कितीतरी पटीने वाढेल. चांगले रस्ते, चांगली वैद्यकीय सेवा दिली जाईल. गोरगरीबांना मोफत उपचार दिले जातील,अशी ग्वाही मोदी यांनी दिली.