नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलीस दलात म्हणजे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.कारण आता सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना आपल्या मराठी मातृभाषेतून देणे शक्य होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफ भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
सीआरपीएफमध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.आता सीआरपीएफ भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत घेतली जाणार आहे.गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे.ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात.
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १ जानेवारी २०२४ पासून १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.तत्पूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. स्टॅलिन यांनी या भरती परीक्षेत ‘बेसिक हिंदी अंडरस्टँडिंग’साठी ठेवलेल्या २५ टक्के गुणांची तक्रार केली होती