‘पॉवर बँक’मुळे भारतीय महिलेला अमेरिकेच्या विमानतळावर 8 तास अडवले, पुरुष अधिकाऱ्याकडून तपासणी, नक्की प्रकरण काय?

Shruti Chaturvedi Airport Detention | भारतीय उद्योजिका श्रुती चतुर्वेदी (Shruti Chaturvedi) यांना अमेरिकेतील अलास्का (Alaska) राज्यातील अँकरेज विमानतळावर (Anchorage Airport) तब्बल 8 तास स्थानबद्ध ठेवण्यात आले. त्यांच्या हँडबॅगमध्ये असलेल्या पॉवर बँकवर “संशय” व्यक्त करत, विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी (Airport Security Officers) त्यांच्यावर संशय घेतला आणि एका पुरुष अधिकाऱ्याने थेट शारीरिक तपासणी केली, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला आहे.

चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ ( Twitter) वर या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभवांपैकी एक होता.” यामध्ये त्यांना गरम कपडे काढायला लावले गेले, थंड खोलीत तासन्‌तास थांबायला लावले, पोलिस आणि एफबीआय (FBI) ने विचारपूस केली, आणि त्यांना ना वॉशरूम वापरण्याची, ना फोन कॉल करण्याची परवानगी दिली गेली.

चतुर्वेदी या ‘इंडिया ॲक्शन प्रोजेक्ट’ (India Action Project) आणि ‘चायपानी’ (Chaipani) या स्टार्टअप्सच्या संस्थापिका आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, तपासादरम्यान त्यांचा मोबाईल फोन (Mobile Phone) आणि पाकीट (Wallet) ताब्यात घेण्यात आलं आणि विमान उड्डाण करण्याआधी त्यांना सोडण्यात आलं नाही, त्यामुळे त्यांची फ्लाइट हुकली

“कल्पना करा पुरुष अधिकाऱ्यांकडून तपासणी, हास्यास्पद प्रश्न, मोबाईल आणि पाकीट काढून घेणं, थंडीतील खोलीत ताब्यात ठेवणं, शौचालयही वापरू न देणं, फोन करण्याची परवानगी न देणं, फ्लाइट चुकवणं – हे सगळं केवळ एका पॉवर बँकवरून,” असं तीव्र शब्दांत त्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला.

“मला याची कल्पना करण्याची गरज नाही, मी हे सगळं स्वतः अनुभवले आहे. आणि हे सर्व कशामुळे घडलं हे आपल्याला चांगलंच माहीत आहे,” असं म्हणत चतुर्वेदी यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला देखील टॅग केलं.

दरम्यान, चतुर्वेदी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. चतुर्वेदी यांचा अनुभव अमेरिकेच्या वाढत्या सुरक्षाव्यवस्थेचा आणि इमिग्रेशन धोरणांतील (Immigration Policy) बदलाचा प्रत्यय देणारा आहे.