15 ऑगस्टच्या भाषणासाठी सूचना पाठवा! मोदींचे आवाहन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 112 वा भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक, आसाम मोइदम, व्याघ्र दिन, जंगलांचे संवर्धनावर भाष्य केले आणि त्यांनी मॅथ्स ऑलिम्पियाडच्या चार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशवासीयांना असे आवाहन केले की, लाल किल्ल्यावरील 15 ऑगस्टच्या भाषणाबाबत मला सूचना पाठवा. यादिवशी हातमागाचे कपडे नक्की खरेदी करा.
आजच्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी हातमागाच्या वस्त्रांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, 7 ऑगस्टला आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. हातमागाकडे जग आकर्षित होत आहे. अनेक कंपन्या एआयच्या माध्यमातून याचा प्रचार करत आहेत. हातमागावर बोलणे आणि खादीवर चर्चा करणे शक्य नाही. खादी व्यवसाय 400 टक्क्यांनी वाढून 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तुमच्याकडे भरपूर कपडे असतील. परंतु स्वातंत्र्यदिनानिमित्त खादीचे कापड नक्कीच खरेदी करा. गेल्या काही वर्षांपासून गरीब-श्रीमंत प्रत्येक जण ‘हर घर तिरंगा’ मोहिमेशी जोडला गेला. लोकांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट केला. आता कार आणि ऑफिसमध्ये तिरंगा झेंडे लावले जातात. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी तिरंगा डॉटकॉमवर प्रत्येक घरात तिरंगासोबत सेल्फी अपलोड करा. दरवर्षी तुम्ही मला भरभरून सूचना पाठवता. तशाच यंदाही लाल किल्ल्यावरील 15 ऑगस्टच्या भाषणासाठी माझ्या घरच्या पत्त्यावर सूचना पाठवा.
मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या आसामच्या मोइदममधील अहोम वंशाच्या स्मशानभूमीबद्दल ते म्हणाले की, आसाम मोइदम हेरिटेज साईट झाल्यामुळे येथे अधिक पर्यटक येतील. भविष्यात तुम्हीही येथे जा. उद्या जगभरात व्याघ्र दिन साजरा केला जाणार आहे. भारतात वाघ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आम्ही कथा ऐकल्या आहेत. जंगलाच्या आजूबाजूचे लोक वाघासोबत राहतात. वाघांच्या संवर्धनासाठी अभूतपूर्व प्रयत्न करत आहेत. राजस्थानमध्ये कुर्‍हाडी बंद पंचायत मोहीम खूप काम करत आहे. कुर्‍हाड घेऊन न जाण्याची, झाड न तोडण्याची शपथ स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे वाघांसाठी वातावरण तयार होत आहे. जगात 70 टक्के वाघ आपल्या देशात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top