मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ४० हजार जणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधीचा भव्य सोहळा पार पडणार आहे. देशातील १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि १६ धर्मगुरू शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.सिनेमा थिएटरमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
शपथविधीच्या निमंत्रितांमध्ये सोहळ्याचे शरद पवार गटाचे शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी यांसह अनेक बड्या पाहुण्यांचा समावेश आहे. तसेच १९ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून त्यात योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), चंद्राबाबू नायडू (आंध्रप्रदेश), नितीन कुमार (बिहार), प्रेमा खांडू (अरुणाचल प्रदेश), हिमंत बिश्व शर्मा (आसाम), विष्णूदेव साय (छत्तीसगढ), प्रमोद सावंत (गोवा), भूपेंद्र पटेल (गुजरात), नायब सिंह सैनी (हरियाणा), मोहन यादव (मध्य प्रदेश), कॉनराड संगमा (मेघालय), भजनलाल शर्मा (राजस्थान), मानिक साहा (त्रिपुरा), पुष्कर सिंह धामी (उत्तराखंड) यांचा समावेश आहे. तसेच१०० हून अधिक साधू-महंत, मराठी कलाकार, मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती, सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत, १० हजार लाडक्या बहिणी, गायक अजय-अतुल, कैलास खेर, ‘जो राम को लाये है हम उनको लायेंगे’ या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तलदेखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. नागपुरातील गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी खास आमंत्रण पाठवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला होता. आता शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजपा कार्यकर्ते एक है तो सेफ है, असा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचे सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण होणार आहे. महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटरमध्ये लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ही माहिती भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली.
दरम्यान, भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.या आमदारांची उद्या सकाळी विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित केले जाणार आहे.