अहमदाबाद- ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्ताव लवकरच हिवाळी अधिवेशनात मांडून मंजुरी दिली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी आज केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 149व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. त्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना ‘राष्ट्रीय एकता दिना’च्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर काम करत आहोत. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल. या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. भारत आता समान नागरी कायद्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखाही मांडला. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 आपल्या सरकारने कायमस्वरूपी जमिनीत गाडून टाकले, असे मोदी म्हणाले. काश्मीरमधील दहशतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे, असा दावाही मोदी यांनी केला. विकासाच्या मार्गावर निरंतर वाटचाल करत असलेल्या भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. याप्रसंगी मोदींना एकता दिवस परेडच्या वतीने मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानाने हवाई सलामी दिली.