काठमांडू – नेपाळमध्ये महापुरामुळे आतापर्यत मृतांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे, तर ६४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. महाकाली नदीला आलेल्या पुरात दारचुला जिल्ह्यात तब्बल १२२ घरे वाहून गेली. पश्चिम नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील किमान सहा नेपाळी तरुण पुरात वाहून गेले आहेत. महाविद्यालयीन परीक्षा संपवून ते नोकरीसाठी भारतात जात होते.नेपाळमध्ये सलग ३ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमध्येही पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोसी, गंडक, बुढी गंडक, कमला बालन, बागमती आणि गंगा या नद्यांच्या पाणी पातळीने अनेक ठिकाणी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. बिहारच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव संतोष कुमार मल यांनी सांगितले की, कोसीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे बीरपूरमध्ये नदीवर बांधलेल्या बॅरेजचे सर्व ५६ दरवाजे उघडावे लागले. १९६८ नंतर पहिल्यांदाच बॅरेजचे सर्व दरवाजे उघडावे लागले आहेत.
