Toll Collection: देशात टोल वसुलीसाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. सरकारकडून टोल नाक्यांवरील वाहतुकीच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी व जलद प्रक्रिया व्हावी यासाठी फास्टॅग सुरू करण्यात आले. याचा परिणामही दिसू लागला असून, डिसेंबर 2024 मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) सर्वाधिक टोल गोळा करण्यात आला. या एक्सप्रेसवर डिसेंबर 2024 मध्ये 163 कोटी रुपये टोल वसूल करण्यात आला.
देशभरात एक्सप्रेसवचा विस्तार झाला आहे. त्यामुळे टोल महसूलात देखील लक्षणीय वाढ दिसून येत आहे. 2024 डिसेंबरमध्ये त्याआधीच्या वर्षातील त्याच महिन्याच्या तुलनेत अधिक टोल जमा झाला आहे.
IRB Infra Developers Limited आणि IRB Infra Trust यांनी जाहीर केलेल्या डेटानुसार, देशभरात टोल संकलनात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये टोल संकलनाचा आकडा 488 कोटी रुपये होता. डिसेंबर 2024 मध्ये यात 19 टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा 580 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची लांबी फक्त 94.5 किमी असली तरीही देशात सर्वाधिक टोल संकलन याच मार्गावर झाला आहे. या मार्गावर डिसेंबर 2023 मध्ये टोल संकलन 158.4 कोटी रुपये होते. तर डिसेंबर 2024 मध्ये यात वाढ होऊन हा आकडा 163 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपाठोपाठ अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे आणि NH48 ने डिसेंबर 2024 मध्ये 70.7 कोटी रुपये टोल संकलन केले. या आकडेवारीवरून देशभरातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर टोल संकलनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.