मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र,निवडणूक कालावधीत निकालांचे अंदाज म्हणजेच ओपिनियन पोल व एक्झिट पोल प्रसारित करण्यावर प्रतिबंध आहे अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशावेळी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, निवडणूक अंदाज वर्तविणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांचे प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.