पणजी- सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सनबर्न पार्टी’ला दक्षिण गोव्यात विरोध केला जात आहे. त्यानंतर आता उत्तर गोव्यातही स्थानिकांनी सनबर्न विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
गावातील शांतता भंग करणारे आणि ध्वनी प्रदूषण करणारे मोठे इव्हेंट किंवा सनबर्नसारखे इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल यंदा कोणत्याही परिस्थितीत हणजूण किंवा उत्तर गोव्यात नकोत म्हणत या इव्हेंटना कडाडून विरोध असल्याचे जागरूक नागरिकांनी स्पष्ट केले आहे.हणजूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कपिल कोरगावकर, डॉ. इनासिओ फर्नांडिस, जॅनी क्रास्टो,जोकिम बार्सेस यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.या सर्वांनी सांगितले की,उत्तर गोव्यात किंवा हणजूण गावात आम्ही सनबर्न होऊ देणार नाही.त्यासाठी आम्ही न्यायालयाची पायरी चढू.हा महोत्सव झाल्यास आम्ही इव्हेंटच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारून विरोध करणार,असा इशाराही या स्थानिक जागरूक नागरिकांनी यावेळी दिला