मुंबई- सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्यांच्या निवासी मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्यानंतर ईडीने जारी केलेल्या बेदखल नोटीशीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना पुण्यातील पवना धरणाजवळील त्यांचा बंगला आणि मुंबईतील सांताक्रूझ येथील फ्लॅट रिकामा करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पी. के.चव्हाण यांच्या खंडपीठासमोर उद्या गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण २०१८ मधील आहे. तेव्हा ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अमित भारद्वाजची चौकशी सुरू केली होती.शेट्टी किंवा कुंद्रा या दोघांचेही या गुन्ह्यात किंवा अंमलबजावणी प्रकरण अहवालमध्ये आरोपी म्हणून नाव दिलेले नाही.मात्र एप्रिल २०२४ मध्ये ईडीने कुंद्रा दाम्पत्याला त्यांच्या निवासस्थानासह त्यांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याची नोटीस बजावली होती. शेट्टी आणि कुंद्रा यांनी दावा केला आहे की त्यांनी संपूर्ण तपासात सहकार्य केले आहे,कुंद्रा हे वैयक्तिकरित्या अनेक समन्सला उपस्थित राहिले असून शिल्पाने तिच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत.