नागपूर – नागपूरमधील ऑडी कार अपघाताच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपाला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. अपघातापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी हॉटेलमध्ये दारूसोबत गोमांस बीफ कटलेट खाल्ले होते, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केला. यामुळे राजकीय खळबळ माजली. मात्र हा आरोप सपशेल खोटा आहे, असा जाहीर दावा संबंधित हॉटेलचे मालक आणि नागपूर पोलिसांनी संध्याकाळी केला.
नागपूरच्या ऑडी कार अपघात प्रकरणातील आरोपी संकेत बावनकुळे आणि त्यांच्या मित्रांनी लाहोरी हॉटेलमध्ये दारूसोबत बीफ कटलेट खाल्ल्याचा संजय राऊतांनी आरोप केला होता. या आरोपामुळे सदर प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. पण नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी बिलामध्ये कुठेही बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याचे सांगून राऊतांचे आरोप फेटाळले. तर हॉटेलमालक समीर शर्मा यांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन मेनू कार्डमध्ये कुठेही बीफचा उल्लेख नाही. त्यामुळे आमच्या हॉटेलविषयी चुकीची माहिती पसरवणार्या राऊतांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची माहिती दिली.
दुसरीकडे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तडक नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. अपघात झाल्यानंतर गाडीतील तीन जणांपैकी दोघांचे रक्ताचे नमुने घेतले, मग गाडीत असलेल्या संकेत बावनकुळेचे नमुने का घेतले नाही यासह अनेक प्रश्न अंधारे यांनी पोलिसांसमोर उपस्थित केले.
अपघात झाला त्याच्या काही वेळ आधी संकेत राऊत आणि त्याच्या मित्रांनी लाहोरी हॉटेलमध्ये खाणे-पिणे केले. त्या हॉटेलचे बिल पोलिसांनी जप्त केले आहे. या बिलामध्ये दारू, चिकन, मटण आणि बीफ कटलेटचा उल्लेख आहे. इतरांना गोमांस खाऊ नका, असा सल्ला देणार्या आणि गोमांस खाण्यावरून किंवा त्याची वाहतूक केल्याच्या संशयावरून मुस्लिमांचे मॉब लिंचिंग करणार्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा गोमांस खातो का, हे देशाच्या जनतेला कळले पाहिजे, असे राऊत म्हणाले. त्याचबरोबर अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि लाहोरी हॉटेलचे बिल जनतेसमोर आणा, असे आवाहन त्यांनी नागपूर पोलिसांना केले.
सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी पोलिसांच्या संपूर्ण तपासावरच संशय व्यक्त केला. अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये तीन जण होते. मग अर्जुन हावरे आणि रोहित चिंतमवार या दोघांचीच वैद्यकीय चाचणी का केली? संकेत बावनकुळेचे रक्ताचे नमुने का घेतले नाहीत? जर गाडी अर्जुन हावरे चालवत होता तर वैद्यकीय चाचणी त्याची एकट्याचीच करायला हवी होती, दोघांची का केली? अपघातग्रस्त गाडी पोलीस ठाण्यात जमा करायच्या आधीच गॅरेजमध्ये का पाठवण्यात आली? अपघात घडल्यावर जागेवर पंचनामा का केला नाही? एफआयआरमध्ये अपघात झाला तेव्हा गाडीची स्थिती, गाडीचा नंबर, ती कोणाच्या नावावर आहे याचा उल्लेख का नाही? पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत? अशा एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार अंधारे यांनी केला. सीताबर्डी पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर अंधारे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळीही त्यांनी हे सारे मुद्दे उपस्थित केले. संकेत बावनकुळे लाहोरी बारमध्ये दूध प्यायला गेला होता का, असा उपहासात्मक सवालही त्यांनी उपस्थित केला. महत्त्वाची बाब म्हणजे सुषमा अंधारे आणि त्यांचे सहकारी जेव्हा सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा तिथे आधीपासूनच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी जमलेले होते. त्यातील काही प्रतिनिधी अंधारे यांच्यासोबत पोलीस निरीक्षक चकाटे यांच्या कक्षात गेले. मात्र त्यांना पोलिसांनी कक्षातून बाहेर काढले.
अपघाताचे काँग्रेस कनेक्शन
दरम्यान, या अपघात प्रकरणातील काँग्रेस कनेक्शन आज उघड झाल्याने वादाला वेगळे वळण लागले. अपघात झाला तेव्हा गाडी चालवत असलेला अर्जुन हावरे हा काँग्रेसचे नेते जितेंद्र हावरे यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली. नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी काल संकेत बावनकुळे याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामागे हेच कारण असावे असे सूचक विधान अंधारे यांनी केल्याने महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शेरेबाजी झाली. विकास ठाकरे यांना मीडियासमोर येऊन खुलासा करावा लागला. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे अशीच माझी भूमिका आहे, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.