मुंबई – देशी प्रजातीची गाय आता राज्यमाता-गोमाता आहे, असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकर्यांना देशी गायीचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना दर दिवशी अनुदान देण्याची योजना सरकारने आज जाहीर केली.
राज्यातील देशी गायींच्या संख्येत गेल्या वर्षात घट झाली आहे. 2029 साली केलेल्या 20 व्या पशुगणनेनुसार आधीच्या तुलनेत 20.69 टक्के घट झाली आहे. ही घट रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशी गाय राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करून देशी गायींचे पालन करण्यासाठी शासनाकडून प्रति दिन प्रती गाय 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय
घेण्यात आला.
मध्य प्रदेश व राजस्थानात गायींसाठी 40 रुपये प्रतिदिन इतके अनुदान दिले जाते. किमान शंभर गायी असलेल्या गोशाळांसाठी हे अनुदान दिले जाते. राज्यात मात्र आता प्रति गाय 10 रुपये अधिक म्हणजे 50 रुपये अनुदान दिले जाणार आहे. याचा फायदा गोपालन करणार्या सर्व शेतकर्यांना होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती गठीत केली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग ऑनलाईन या योजनेची अंमलबजावणी करणार आहे .
गोशाळांच्या बळकटीसाठी व त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्यात 2017 पासून गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना सुरू आहे. या योजनेनुसार 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळांना एकरकमी 15 लाख रुपये, 100 ते 200 गायींसाठी 20 लाख रुपये तर 200 हून अधिक गायी असलेल्या गोशाळांसाठी 25 लाख रुपये अनुदान दिले जाते.