ठाणे – ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा लागल्याने अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या. याची माहिती मिळताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र अद्याप ही आग विझवण्यात आली नाही.
दुर्मीळ औषधी वनस्पती आणि वन्य प्राण्यांसाठी तानसा अभयारण्य प्रसिद्ध आहे. बुधवारी सायंकाळी अचानक या अभयारण्याच्या जंगलात वनवा भडकला. ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. मात्र, पाहता पाहता वनव्याने भीषण रूप धारण केले आणि वणव्याची आग संपूर्ण जंगलात पसरू लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ प्रयत्न सुरु केले. मात्र, वनकर्मचारी संपावर गेले आहेत. तेथे कर्मचारी कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना अडचणी येत आहे. वनव्याच्या भडक्यात तानसा अभयारण्यातील अनेक दुर्मिळ वनसंपत्ती भस्मसात झाल्या. अनेक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी आग लागून हजारो झाडांचे नुकसान होण्याचा प्रकार घडत आहेत. मात्र, वनविभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे नागरिकांनी म्हटले.