कर्जत – आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाने एका कार चालकाला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला होता. मात्र मारहाण करणारा माझा अंगरक्षक नाही, मारहाण झाला तो माझा नातेवाईक आहे असा खुलासा आमदार थोरवे यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून मला बदनाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचालकाला मारहाणीची घटना झाली. त्या घटनेचे कधीच समर्थन करणार नाही. मारहाण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ठाकरे गटाकडून मारहाण करणारा माझा अंगरक्षक असल्याचे सांगितले जात आहे. मारहाण करणारी व्यक्ती माझा अंगरक्षक नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. उलट ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दोघांमध्ये काय मतभेद झाले याची मला कल्पना नाही. याची माहिती मी घेत आहे. मारहाण करणाऱ्याशी माझा काही संबंध नाही. मी पोलिसांना त्याला अटक करण्यास सांगितले आहे. मारहाण झालेले अमर बांदल म्हणाले की, विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे.
ठाकरे गटाकडून माझी बदनामी! आमदार थोरवे यांचा आरोप
