पालघर – मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गेल्या १२ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.या मागणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची लेखी मंजुरी मिळाली असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली.
प्रकाश निकम यांनी नुकतीच खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ही प्रस्ताव मंजुरीची घोषणा केली. तसेच निकम यांनी लगेचच संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या बाबी पूर्ण करून निवडणूक आचारसंहितेआधी हे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ महसुली गावे आणि जवळपास ६० हून अधिक गावे येतात.त्यामुळे इथल्या व्यवस्थेवर मोठा ताण पडत असतो.अशा परिस्थितीत याठिकाणी शासनाने ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी द्यावी अशी मागणी २०१६ पासून केली जात होती.खोडाळा ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव तयार करून पाठविला होता.या प्रस्तावाला आता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.त्यामुळे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आता श्रेणीवर्धन करण्यात आल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली आहे.