नाशिक – सरसकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध करताना मराठा आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्याबद्दल पातळी सोडून टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज येवला या त्यांच्याच मतदारसंघात दणका बसला. भुजबळांच्या पाहणी दौर्यावेळी त्यांना अडविण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून त्यांचा अक्षरश: पाठलाग केला, ‘भुजबळ गो बॅक’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आंदोलकांचा संताप इतका तीव्र होता की, कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही भुजबळांना मार्ग बदलून जावे लागले.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्री भुजबळांनी आज सकाळी अजित पवार गटाच्या शिबिराला न जाता आपल्या येवला मतदारसंघात पाहणी दौरा आयोजित केला होता. मराठा आंदोलकांनी त्यांना रोखण्याचा इशारा दिला होता, पण त्याला न जुमानता भुजबळ येवल्याकडे निघाले. विंचूर चौफुलीवर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. लासलगावलाही मराठा आंदोलकांनी भुजबळांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करीत संतप्त मराठा कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेऊन बसले होते. आम्हीच तुम्हाला निवडून दिले, पण यावेळी देणार नाही. तुम्ही आरक्षणाला विरोध करता. तुमच्यासाठी आम्ही काळ्या अंडरवेअर आणल्या आहेत. अशा शब्दांत ते संतप्त प्रतिक्रिया देत होते. त्यांचा आवेश पाहून भुजबळांनी दौर्याचा मार्ग बदलला आणि विंचूर चौफुलीचा मार्ग सोडून त्यांचा ताफा दुसर्या मार्गाने गेला. मात्र जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. लासलगावच्या कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाजाने आक्रमक होऊन ‘छगन भुजबळ गो बॅक’च्या पाट्या हातात घेऊन घोषणाबाजी केली. ‘कांद्याचे निर्यात शुल्क जेव्हा सरकारने अव्वाच्या सव्वा वाढवले होते, तेव्हा भुजबळ कुठे होते,’ असा संतप्त सवाल आंदोलक विचारत होते. ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. ‘भुजबळ गो बॅक’चे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीलाही चिकटवले होते. ‘छगन भुजबळांना आम्ही निवडून दिले, आम्हीच त्यांना पाडणार’ असेही हे आंदोलक म्हणत होते. भुजबळ जिथे जात होते तिथे पोहोचण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्ते करीत होते. हातात काळे झेंडे घेऊन दुचाकीवरून गनिमी काव्याने ते भुजबळांचा पाठलाग करीत होते. येवल्याच्या सोमठानदेश गावात भुजबळांनी पाहणी केली आणि दौरा आटोपून ते परतले. भुजबळ ज्या मार्गावरून गेले, तेथे आंदोलकांनी गोमूत्र शिंपडले आणि पुन्हा घोषणाबाजी केली. आंदोलकांचा आवेश पाहून निफाड दौरा रद्द करत भुजबळ शहापूरच्या दिशेने रवाना झाले.
राज्यात मराठी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्यावर भुजबळांनी जाहीर सभेत वैयक्तिक टीका केली. ओबीसीत सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासही विरोध केला. यामुळे मराठा आंदोलक संतप्त आहेत. त्याचाच दणका भुजबळांना आज बसला. मात्र आंदोलक नाशिकमधील नव्हते, असा दावा भुजबळांनी केला. भुजबळ म्हणाले की, या मतदारसंघात तीन लाख लोक आहेत. त्यापैकी किती विरोध करत होते? त्यातीलही काही बाहेरचे होते. ही मंडळी केवळ राजकीय विरोध करणारी आहेत. ज्यांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत ती ही मंडळी आहेत. सर्व ठिकाणी मी शांततेने पाहणी केली. शेतकरी ढसाढसा रडत होते. चार-पाच वर्षांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे एकेकाचे नुकसान 5 लाखांचे झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्यात अवकाळीमुळे झालेली भयाण परिस्थिती पुढे येणे गरजेचे आहे. ती प्रत्यक्ष पाहणे गरजेचे होते. म्हणून मी हा पाहणी दौरा केला.