हेग- नेदरलँडमधील हेग येथील एका निवासी इमारतीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात पाच जण ठार झाले असून या स्फोटामुळे या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. स्फोटाने शेजारच्या इमारतीनाही फटका बसला असून त्यातही काही लोक अडकल्याची भीती हेगच्या महापौरांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक वेळेनुसार आज सकाळी सव्वासहा वाजता हेगमधील एका निवासी इमारतीत हा स्फोट झाला. इमारतीचा काही भाग पडल्याने तिथे राहणारे लोकही ढिगाऱ्याखाली दबले गेले. या स्फोटामुळे आजूबाजूच्या पाच इमारतींचेही नुकसान झाले. या प्रकरणी पोलीस तपास सुरु करण्यात आला असून स्फोटानंतर या ठिकाणाहून एक भरधाव गाडी निघून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचे पोलीस म्हणाले. अग्निशमन दलाने इथे तातडीने मदतकार्य सुरु केले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखीही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्यांची जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे हेगच्या महापौरांनी म्हटले आहे.