भोपाळ – मध्यप्रदेशातील खजुराहो येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, देशातील पहिल्या केन-बेटवा या राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान मोदींना स्मृतिचिन्ह भेट दिले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले की, पूर्वीचे काँग्रेस सरकार घोषणा देण्यात तरबेज होते. परंतु त्यांच्या घोषणांचा लाभ सामान्य जनतेला कधीच झाला नाही. काँग्रेस सरकारांच्या योजनांचा ना हेतू होता, ना त्यांना गांभीर्य होते. आमच्या सरकारने गरिबांसाठी जनधन खाती उघडून, प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून दिला.
ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांची भारताच्या केंद्रीय जलआयोग निर्मितीच्या मागे मोठी भूमिका आहे काँग्रेसने त्याचे श्रेय बाबासाहेबांना कधीच दिले नाही. देशातील राज्यांमध्ये पाण्यावरून अनेक वाद होते. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या जलशक्तीसाठी प्रयत्न केले.
ते म्हणाले की, आगामी काळात मध्य प्रदेश देशाच्या सर्वोच्च अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. यामध्ये विकसित मध्य प्रदेश आणि विकसित भारत बनवण्यात बुंदेलखंड मोठी भूमिका बजावणार आहे.