US immigration | अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यांबाबत सध्या अनिश्चितता वाढली आहे. ट्रम्प प्रशासन जवळपास 43 देशांतील (US’ proposed travel ban list) नागरिकांसाठी अमेरिकेत येण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. यामुळे कायदेशीर तज्ज्ञांनी H-1B कर्मचारी (H-1B Visa), F-1 विद्यार्थी आणि ग्रीन कार्ड धारकांना परदेशात प्रवास करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
या संभाव्य निर्बंधांच्या यादीत भारताचा समावेश नाही. तरीही भारतीय प्रवाशांना कडक सुरक्षा तपासणी, व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये विलंब आणि अमेरिकन विमानतळांवर अडवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन इमिग्रेशन वकिलांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेत नोकरीसाठी किंवा व्हिसा नूतनीकरणासाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इतर देशांतील अमेरिकन दूतावासांमध्ये व्हिसा स्टॅम्पिंगला मोठा विलंब होत असून, प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे.
अनेक अर्ज अस्पष्ट कारणांमुळे प्रशासकीय पुनरावलोकनात अडकत आहेत, ज्यामुळे प्रक्रियेचा कालावधी लांबतो. विशेषतः H-1B आणि F-1 व्हिसाधारकांना अमेरिकेतून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या प्रवासाच्या योजना नीट तपासाव्यात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
याआधी, नॉन-इमिग्रंट व्हिसा 48 महिन्यांत संपला असेल तर मुलाखतीशिवाय पुन्हा जारी करता येत होता. पण आता हा कालावधी 12 महिन्यांवर आणला आहे. यामुळे अधिक लोकांना प्रत्यक्ष मुलाखती द्याव्या लागत आहेत, ज्याने व्हिसा नूतनीकरण प्रक्रिया अवघड झाली आहे.