Sunita Williams Returns | नासाच्या (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आल्या. स्पेसएक्सच्या (SpaceX) ड्रॅगन अंतराळयानाद्वारे दोघेही अंतराळवीर सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले आहे. या अंतराळयानातून 17 तासांच्या प्रवासानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची घरवापसी झाली.
हे दोघे अंतराळवीर जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते.त्यांची नियोजित मोहीम केवळ एक आठवड्यासाठी होती. परंतु, स्टारलायनच्या तराळयानातील हीलियम गळती आणि वेग कमी होण्याच्या समस्येमुळे त्यांना तब्बल 9 महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागले होते. अखेर ते दोघेही जण सुरक्षितरित्या घरी परतले आहेत.
ड्रॅगन अंतराळयानाच्या कॅप्सूलने भारतीय वेळेनुसार 19 मार्च रोजी सकाळी 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात लँडिंग (स्प्लॅशडाउन) केले. त्यानंतर अंतराळयानातील सर्व प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. नासाने विल्यम्स आणि विल्मोर हे पृथ्वीवर परतल्याचा व्हीडिओ देखील शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) वरून पृथ्वीपर्यंतचा प्रवास सुमारे 17 तासांचा होता. पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करताना ड्रॅगन कॅप्सूलचा वेग 17,000 मैल प्रति तास होता, जो काही मिनिटांतच झपाट्याने कमी करण्यात आला.
सुनीता विल्यम्स (NASA Astronaut Sunita Williams) यांच्यासह आणखी तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. अमेरिकन बुच विल्मोर आणि निक हेग यांच्यासोबत रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोवही परत आले. निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेसाठी आईएसएसवर पोहोचले होते.
नासाने विल्यम्स व विल्मोर यांची मोहीम यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. दोघांनी 150 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग केले, जे भविष्यात मानवासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.