Earthquake : भूकंप का येतो? भूकंप आल्यास जीव वाचवण्यासाठी काय कराल?

म्यानमार (Myanmar Earthquake) आणि थायलंडमध्ये (Thailand Earthquake) काल (28 मार्च) शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर त्यानंतर आलेला दुसरा झटका 7.0 रिश्टर स्केलचा होता. या भूकंपांमुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकसह म्यानमारमधील अनेक भागांत इमारती, पूल आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. बँकॉकमध्ये बांधकामाधीन इमारती कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतकार्य राबवले जात आहे.

भूकंप का येतो? (why earthquake happens)

भूकंप हा पृथ्वीच्या अंतर्गत टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे येतो. पृथ्वीचा पृष्ठभाग सात मोठ्या आणि अनेक लहान प्लेट्सनी बनलेला आहे. या प्लेट्स सतत हालत असतात आणि जेव्हा त्या एकमेकांवर दबाव टाकतात किंवा धडकतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा जमिनीखालून बाहेर पडते. ही ऊर्जा भूकंपाच्या रूपात धक्के निर्माण करते. म्यानमारमधील सागाइंग फॉल्ट हा संवेदनशील भाग असून, येथे अशा घटना वारंवार घडतात.

भूकंपाच्या वेळी घ्यावयाच्या सुरक्षितता उपाययोजना (Earthquake Safety Tips)

  • आश्रय घ्या – भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान मजबूत टेबलाखाली किंवा दाराच्या चौकटीजवळ लपावे.
  • काचेपासून दूर राहा – खिडक्या, काचेच्या वस्तू आणि जड सामानापासून लांब राहावे.
  • लिफ्टचा वापर टाळा – भूकंपाच्या वेळी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा.
  • मोकळ्या जागेत थांबा – बाहेर असाल तर झाडे, विजेचे खांब आणि इमारतींपासून दूर राहावे.
  • आफ्टरशॉक्ससाठी तयार राहा – भूकंपानंतर लहान मोठे धक्के (आफ्टरशॉक्स) येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.
  • आपत्कालीन साहित्य तयार ठेवा – पाणी, अन्न, टॉर्च आणि प्रथमोपचार साहित्य जवळ असावे.

या भूकंपाने म्यानमार आणि थायलंडमध्ये मोठी हानी केली असून, प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. बचावकार्य सुरू असून, मदतीसाठी विविध देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.