Income Tax: अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता, 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना मिळू शकते करात सवलत

Income Tax : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा आगामी अर्थसंकल्प (Budget 2025-26) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रामुख्याने नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून जास्त अपेक्षा आहेत. यामागचे कारण म्हणजे कराचे दर. कराचे दर जास्त असल्याची तक्रार सातत्याने मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे या अर्थसंकल्पात कर सवलत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 (Budget 2025-26) मध्ये सर्वसामान्यांसाठी सरकारकडून मोठ्या सवलतींची घोषणा केली जाऊ शकते. या अर्थसंकल्पात 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना करसवलतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सध्याचा कर स्लॅब

सध्याच्या नवीन करप्रणालीनुसार, 3 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न कर मुक्त आहे.तर 3 लाख ते 6 लाख रुपये दरम्यानच्या उत्पन्नावर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपये दरम्यान 10 टक्के, 9 ते 12 लाख रुपये दरम्यान 15%, 12 ते15 लाख रुपये दरम्यान 20% आणि 15 लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्नावर 30% टॅक्स लागतो. 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शनमुळे 7.75 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न कर मुक्त आहे.

नवीन बदल काय होऊ शकतात?

केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2025-26) कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. कर स्लॅबमध्ये सुधारणा करून सवलत सीमा प्रत्येकी 1 लाख रुपयांनी वाढवली जाऊ शकते. सध्या 3 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न कर मुक्त आहे. मात्र, ही रक्कम 3 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये केली जाऊ शकते. म्हणजेच, 4 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जाईल. अशाप्रकारे, 14 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना याचा जास्त फायदा मिळेल.