मुंबई- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लाडकी बहीण ‘ या योजनेची घोषणा केली आहे.या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी महिला गर्दी आहेत . त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.परंतु प्रत्यक्षात या योजनेचा लाभ आगामी निवडणुकीनंतरच मिळणार आहे.
‘लाडकी बहीण ‘ योजनेचा अर्ज स्विकारण्याची मुदत ३१ ऑगस्ट असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे निवडणुका पार पडल्यानंतरच ‘लाडकी बहीण’ या योजनेचा प्रत्यक्ष लाभ अर्जदार महिलांना मिळणार आहे.महायुती सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही योजना महाराष्ट्रात राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यातच या योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ही योजना भाजप सरकारच्या राज्यातील असल्याने भाजप पदाधिकारी या योजनेचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.तर या योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्याने राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी या योजनेचे श्रेय घेत आहेत.