मुंबई- लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन राज्यातील पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही आली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने राज ठाकरेंच्या मनसेला घेताना त्यांना एखादी जागा द्यायची की, विधानसभेचा मोठा सौदा करायचा यावर निर्णय आजही झाला नाही. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांची राज ठाकरेंशी भेट झाल्यानंतरही पुन्हा तिघे नेते दिल्लीवारी करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे कळते. अजित पवार या चर्चांपासून दूर आहेत हे विशेष आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपले सर्व दौरे रद्द करून अमित शहांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली तेव्हाच ते महायुतीत येणार हे स्पष्ट झाले. आज त्यांनी सकाळी 11 वाजता आपल्या पदाधिकाऱ्यांना या भेटीची माहिती देण्यासाठी शिवतीर्थावर बोलावले. दरम्यान दिल्लीहून परतल्यावर काल रात्री राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. आज सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक नियोजित असताना राज ठाकरे यांनी वांद्रे येथील ताज लॅण्डस एण्ड हे पंचतारांकित हॉटेल गाठले. तिथे 19 व्या मजल्यावर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तिघांत दीड तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी न बोलता तिघेही निघून गेले. या बैठकीत भाजपाला 27, शिंदे गट 14, अजित पवार गट 4 आणि मनसे 2 असे जागावाटप ठरल्याची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर तिघे नेते दिल्लीवारी करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान आज वरळीत शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी अनेक इच्छुक नेते त्यांना भेटायला येत होते. सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार गाठीभेटी घेत होते. त्याचवेळी अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार आणि तटकरे परस्पर निर्णय घेतात अशी आमदारांची तक्रार आहे. तटकरे यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले आणि बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा मिळावा यासाठी हेलिकॉप्टरने भोर गाठून आनंदराव थोपटेंची मनधरणी केली. येत्या दोन दिवसात जागावाटप अंतिम होणे गरजेचे आहे.