Maharashtra Academic Year | राज्यात दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. मात्र, यंदा शैक्षणिक वर्षात बदल केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शिक्षण विभाग 2025-26 वर्षापासून राज्यातील शाळांसाठी शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून करण्याचा विचार करत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास यंदा 1 एप्रिलपासून राज्यातील शाळा सुरू होऊ शकतात.
माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील 1 एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती दिली. तसेच, यासंदर्भात कोणतीही गोंधळाची स्थिती नसून, जिल्हा तसेच तालुका स्तरावरील अधिकारी सुरळीत प्रक्रिया पार पाडण्यासाठी समन्वय साधत असल्याची माहिती त्यांनी दिली.
बालभारती येथे पंकज भोयर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना पंकज भोयर यांनी माहिती दिली की, यावर्षी पहिल्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांसाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, तर पुढील इयत्तांसाठी टप्प्याटप्प्याने यामध्ये बदल करण्यात येतील.
तसेच, पीएम श्री शाळांच्या धर्तीवर ‘सीएम श्री’ शाळा सुरू करण्यात येणार असून, त्यामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण सुधारण्यावर भर दिला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, विद्यानिकेतन शाळांमध्ये ‘आनंद निवासी गुरुकुल’ सुरू करण्याची सरकारची योजना आहे. ‘आनंद निवासी गुरुकुल’ मध्ये विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि संगीत यामध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, आरटीई अंतर्गत फी परताव्यासंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.