भूकंप का होतात? भूकंप आला तर काय खबरदारी घ्यावी?

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीसह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारतासह नेपाळ, बांगलादेश, भूतानमध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

या भूकंपामध्ये (Earthquake) तिबेटमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल एवढी होती. तिबेटमध्ये आलेल्या या भूकंपात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

भूकंप का होतात?

भूकंप (Earthquake) होण्यामागे मानवी आणि नैसर्गिक अशी दोन्ही कारणे आहेत. टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल हे यामागचे प्रमुख कारण आहे. टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. याशिवाय, मोठे धरण प्रकल्प, खाणकाम किंवा भूगर्भीय स्फोट भूकंपाची मानवी कारणे आहेत.

भूकंपाची तीव्रता

भूकंपाची (Earthquake) तीव्रता रिक्टर स्केलवर मोजली जाते. 0 ते 4.9 रिश्टर स्केल हे सौम्य समजले जाते. 5 ते 5.9 रिश्टर स्केल भूकंप हे मध्यम स्वरुपाचे समजले जातात. 6 ते 7.9 रिश्टर स्केल तीव्रता असलेले भूकंप हे भयानक असतात. यामुळे मोठे आर्थिक नुकसान, जीवितहानी होऊ शकते. तर 8 पेक्षा अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप हे सर्वात धोकादायक मानले जातात.

भूकंप (Earthquake) आला तर काय खबरदारी घ्यावी?

भूकंपाचे धक्के अथवा जमिनीचे कंपन जाणवत असल्यास त्वरित पावले उचलायला हवी. तुम्ही जर घरात असाल तर टेबलाखाली आश्रय घ्यावा. तुमचे डोकं सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी. पंखे, लाइट्स यापासून लांब राहावे. तुम्ही जर बाहेर असाल तर उंच इमारतीपासून लांब राहावे. अशावेळी गाडी चालवणे देखील टाळावे. कंपन थांबल्याची खात्री झाल्यावरच मैदानासारख्या मोकळ्या जागेत यावे.