Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : महाराष्ट्र सरकारकडून गेल्यावर्षी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली होती. कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. रोजगाराची संधी शोधत असलेले तरूण या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. प्रत्येक तालुक्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिबिरांमध्येही नोंदणी करता येईल. नोंदणी केलेले उमेदवार महास्वयम पोर्टलवरील ‘CMYKPY प्रशिक्षण योजना’ विभागातून रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 35 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधारशी जोडलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.
ही योजना सहा महिन्यांसाठी लागू असेल. या कालावधीत पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक मानधन थेट बँक खात्यात जमा केले जाईल. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6,000 रुपये, ITI आणि डिप्लोमा धारकांना 8,000 रुपये तर पदवीधर उमेदवारांना 10,000 रुपये मानधन मिळेल.