चेन्नई- बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या टप्प्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ तामिळनाडूत धडकण्याच्या आधी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून तामिळनाडूतील किनारपट्टीच्या गावातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. चेन्नई विमानतळावरील हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तामिळनाडूच्या चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, काचींपुरम, लिल्पुरम, कल्लाकुरिची, कुड्डालोर जिल्ह्यांबरोबरच पुद्दुचेरी येथे मुसळधार पाऊस पडला असून अनेक भागात पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आयटी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितले आहे. चेन्नई शहरात अनेक रस्ते जलमय झाले असून वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. मद्रास विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चेन्नई समुद्र किनारा ते वेलाचेरी दरम्यान चालणारी उपनगरी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे. चेन्नईचे विमानतळही उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. आज चेन्नईला येणाऱ्या काही विमानांच्या मार्गातही बदल करण्यात आला. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सेवा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळणार असल्याने सर्व मासेमारी व इतर नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून किनारपट्टीवरील गावे रिकामी करण्यात आली आहेत. चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती प्रसासनाने दिली आहे.