मुंबई
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच पुढील आणखी काही दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किमी वेगाने उष्ण वारे गुजरातच्या दिशेने वाहत आहेत. दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. यामुळेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना देखील उष्णतेचा आणि दमटपणाचा फटका बसणार आहे. शिवाय कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या भागात दोन दिवस उकाडा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज असून ढगाळ वातावरण राहणार आहे.