मुंबई
दक्षिण मुंबईतील महानगर पालिकेच्या नायर दंत रुग्णालयात कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन पुकारणार आहेत. चतुर्थी श्रेणी कामगारांची ४० टक्के रिक्त पदे, रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, कंत्राटी कामगारांना भलत्याच कामास जुंपणे यासमस्यांमुळे येथील कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जूनपासून सामूहिक रजा घेऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.
‘मुंबई महापालिकेच्या नायर दंत रुग्णालयात चतुर्थ श्रेणीची १३९ पदे आहेत. यापैकी ७९ पदे भरण्यात आली आहेत. सफाई कामगार, सेवक, हमाल, कक्ष परिचारक, विद्युत विभागातील अन्य कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या कामगारांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. नायर दंत रुग्णालय प्रशासनाने नुकतीच प्रशासकीय पदे भरली. मात्र चतुर्थ श्रेणीतील पदे अद्याप भरलेली नाहीत. यासाठी २४ एप्रिल ते २ मे या कालावधीतआंदोलनही केले. यावेळी कामगार संघटना व रुग्णालय प्रशासनात बैठकही होऊन चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले होते,’ असेही नारकर म्हणाले.
दरम्यान, ही पदे अद्यापही भरण्यात आली नसून, कार्यरत कामगारांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. तसेच बारा कंत्राटी कामगारांचीही नियुक्ती वॉडबॉय म्हणून करण्यात आली. मात्र त्या पदाच्या कामांऐवजी दुसऱ्याच कामाची जबाबदारी त्यांना देण्यात येत असल्याने रुग्णसेवेत अडचण निर्माण होते. त्यामुळे चतुर्थ श्रेणीतील ४० टक्के रिक्त पदे भरण्यात यावी, या मागणीसाठी कामगार १ जूनपासून सामूहिक रजा घेऊन उपोषण करणार आहेत.