नागपूर दंगल नियोजित नाही! बांगलादेशी नाहीत! महिला पोलिसांचा विनयभंग नाही! फडणवीसांची माहिती

नागपूर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जाऊन तिथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नागपूरची दंगल पूर्वनियोजित नव्हती. या दंगलीचे बांगलादेश कनेक्शनही आढळलेले नाही. या दंगलीत महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचेही खोटे आहे. मात्र जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
फडणवीस यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दंगलीचा घटनाक्रम आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, मी याबाबत काही गोष्टी सभागृहातही स्पष्ट केल्या आहेत. औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर त्या दिवशी सकाळी जाळण्यात आली. काही लोकांनी याची पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी ती दाखलही केली होती. पण कबर जाळताना पवित्र कुराणमधील आयत लिहिलेली चादर जाळल्याचा भ्रम तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. जमावाने तोडफोड व जाळपोळ केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ले केले. पोलिसांनी चार-पाच तासांतच दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक गोष्टींचा वापर पोलिसांनी केला. या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध होते, लोकांनी व पत्रकारांनी आपल्या मोबाईलमध्ये जे चित्रीकरण केले होते, त्यात दिसणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली. आतापर्यंत 104 लोकांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 12 जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अजूनही ओळख पटवण्याची कारवाई अजून सुरू आहे. आणखी काही लोकांना अटक केली जाणार आहे. जे जे दंगल करताना दिसत आहेत, दंगेखोरांना मदत करताना दिसत आहेत, त्या प्रत्येकावर पोलीस कारवाई करणार आहेत. सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणात ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ती पसरावी म्हणून पोस्ट केल्या त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दंगल भडकवण्यासाठी मदत केली. सोशल मीडियावरील जवळपास 68 पोस्ट आतापर्यंत ओळख पटवून काढून टाकण्यात आल्या आहेत. अजून काही पोस्टची माहिती घेणे चालू आहे. ज्या लोकांनी दंगल भडकवणारे पॉडकास्ट केले, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली, त्या सर्व लोकांवर कारवाई होणार आहे.
फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांचे नुकसान झाले, ज्यांच्या गाड्या फुटल्या आहेत, त्या सर्वांना येत्या तीन-चार दिवसांत नुकसानभरपाई दिली जाईल. पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले आहे. सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे जनजीवन व व्यापारावर परिणाम होत आहे. त्यात लवकरात लवकर शिथिलता आणण्याचा प्रयत्न आहे. पोलीस सजग राहणार आहेत. कुणीही दंगल करण्याचा प्रयत्न केला, तर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. आता जे नुकसान झाले आहे, ते सर्व नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार आहे. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी ते पैसे दिले नाही तर त्यांची मालमत्ता विकली जाईल. नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरचा एक शांततेचा इतिहास आहे. 1992 नंतर नागपूरमध्ये कधीही अशा प्रकारची मोठी घटना घडलेली नाही. दंगेखोरांना आता सरळ केले नाही, तर त्यांना अशी सवय लागेल. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही सहिष्णुता बाळगली जाणार नाही. तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या घटनेमागच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
ही दंगल पूर्वनियोजित होती, असे काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले होते. आज त्यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, काही अशा सूचक गोष्टी आढळल्या आहेत की, ज्यावरून यामागे काहीतरी कट असावा असे दिसत आहे. काही ठिकाणी लोक तयारीत आहेत, असे त्यातून दिसून आले आहे. परंतु याचा पूर्ण तपास होत नाही, तोपर्यंत अधिकृतरित्या दंगल पूर्वनियोजित होती, असे म्हणणे योग्य होणार नाही. तपास पूर्ण झाल्यावर पोलीस आयुक्त याची माहिती देतील.नागपूर दंगलीत बांगलादेश कनेक्शन असल्याचेही म्हटले जात होते. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, याबाबतीतही तपास सुरू आहे. सोशल मीडियातील काही पोस्टमध्ये अशा काही गोष्टी आढळल्या आहे की, ज्यातून याचे बांगलादेश कनेक्शन आहे, असा संशय यावा. परंतु यात बांगलादेशी आहेत असे तपास पूर्ण होण्यापूर्वी म्हणणे योग्य होणार नाही.
या दंगलीत दंगेखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याच्या वृत्ताचेही फडणवीस यांनी खंडन केले. ते म्हणाले की, महिला पोलिसांच्या बाबतीत असा प्रकार घडला नाही. पोलीस आयुक्तांच्या तपासात असे काही आढळले नाही. मात्र त्यांच्यावर दगडफेक करून जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
दरम्यान, नागपूर दंगलीत जखमी झालेल्या इरफान अन्सारी (38) याचा आज मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले काही दिवस रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. नागपूर दंगलीचा तो पहिला बळी ठरला. या प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि 4 आरोपींना काल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फहीम खान हा अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचे शहराध्यक्ष आहे. त्याने आज नागपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर 24 मार्चला सुनावणी होणार आहे.
अकोला दंगलीचा आरोपी
काँग्रेस समिती सदस्य

देवेंद्र फडणवीस आज नागपुरात असतानाच या दंगलीची माहिती घेण्यासाठी काँग्रेस सत्यशोधन समिती सदस्य नागपुरात दाखल झाले. या समितीत माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, हुसेन दलवाई आदी होते. या समितीवर फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, अकोला दंगलीचा आरोपी काँग्रेसच्या या समितीचा सदस्य आहे. हा दंगेखोर नागपूर दंगलीची चौकशी करायला येत असेल तर ही समिती म्हणजे लांगूलचालन आणि पाय चाटणे आहे.