भांडुप:- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी ३ मार्चला दोन संशयित आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. मात्र अद्यापही मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भांडुपच्या काही भागात सोमवारी रात्री घरोघरी जाऊन हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींचा घरोघरी जाऊन शोध घेण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी ठाण्यातील चिरागनगर परिसरातूनही पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.लक्ष्मी आणि चिराग नगरमध्ये दाखल हल्लेखोर राहत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे ठाणे येथील लक्ष्मी चिराग नगर येथे मनसेचे कार्यकर्ते पोहचले. या ठिकाणी दोन हल्लेखोर वास्तव्य करत असल्याची माहिती ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. आरोपींना शोधण्यासाठी ठाण्यातील मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीनगरात शोध सुरु केला.यावेळी येथील एका महिलेसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा वादही झाला. अखेर पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवली आणि वातावरण निवळले.