DeepSeek Ai: चीनच्या डीपसीक एआयची सध्या जगभरात चर्चा आहे. एकीकडे ओपनएआय, गुगल, एनव्हीडिया, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या एआयच्या निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करत असताना, डीपसीकची निर्मिती अगदी कमी रकमेत झाली आहे. अगदी कमी खर्चात निर्मिती होऊन देखील सध्याचे आघाडीचे जनरेटिव्ह एआय चॅटबॉट चॅटजीपीटी सारखी सुविधा देत असल्याने हे एआय लोकप्रिय झाले आहे.
डीपसीक एआय काय आहे?
चीनच्या हांगझाऊ या शहरामध्ये लिआंग वेनफेंग या तरूणाने डीपसीक नावाच्या कंपनीची स्थापना केली. या तरूणानेच डीपसीक एआयची निर्मिती केली आहे. 40 वर्षीय लिआंग वेनफेंग हा माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहे.
2023 मध्ये डीपसीक लाँच करण्यात आले होते. तर आता याचे DeepSeek-V3 हे नवीन मॉडेल लाँच झाले आहे. हे ॲप अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय मोफत ॲप ठरले. मागील काही दिवसात या ॲपला मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात आले.
डीपसीकची निर्मिती अवघ्या 6 मिलियन डॉलर्समध्ये झाली आहे. तसेच, एकीकडे एआयच्या निर्मितीसाठी कंपन्या आधुनिक चिप्सचा वापर करत असताना, डीपसीकची निर्मिती एनव्हीडियाच्या H800 चिप्सचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी कमी खर्चात याची निर्मिती झाल्याने अमेरिकन टेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
या ॲपच्या लोकप्रियतमुळे व कमी खर्चात निर्मिती झाल्याने आघाडीची कंपनी Nvidia Corp चे मार्केट कॅप एका दिवसात 600 बिलियन डॉलर्सने कमी झाले आहे. डीपसीक ॲप ॲपल स्टोअरवर आणि कंपनीच्या वेबसाईटवरून सहज डाउनलोड करता येईल.