टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री होणार? महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता

Tesla :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर आता इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कंपनीने भारतात नोकर भरती देखील सुरू केली आहे. याशिवाय, कंपनीकडून भारतात कार उत्पादनासाठी प्लांट देखील उभारण्याची शक्यता आहे.

टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनी महाराष्ट्राचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, टेस्लाने टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांशी संभाव्य भागीदारीबाबत चर्चा केली आहे. 

टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. टेस्लाकडून पुण्याजवळील चाकण आणि चिखली या ठिकाणी उत्पादन निर्मिती प्लांट उभारला जाण्याची शक्यता आहे. या भागांना ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते. येथे आधीपासूनच मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोक्सवॅगन आणि बजाज ऑटो यांसारख्या मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत.

टेस्लाकडून महाराष्ट्रासह विविध राज्यातील ठिकाणांचा विचार केला जात आहे. प्लांटसाठी जागा अंतिम करण्यापूर्वी कंपनी विविध घटकांचा विचार करत आहे. लॉजिस्टिक्स आणि निर्यातीसाठी अधिक सोयीस्कर अशी जागा टेस्लाकडून शोधली जात आहे.

दरम्यान, टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. यासाठी 13 जागांची जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. प्रामुख्याने मुंबई आणि दिल्लीत ही भरती केली जाणार आहे.