‘चीनला शत्रू मानण्याचा विचार थांबवावा लागेल’, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला वाद

Sam Pitroda : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी चीनशी संबंधित केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. सॅम पित्रोदा यांनी चीन हा आपला शत्रू नाही. या देशाकडून होणारा धोका हा अनेकदा अतिशयोक्ती स्वरुपात मांडला जातो, असे वक्तव्य केले आहे. तसेच, भारताने चीनला शत्रू मानण्याऐवजी आदर व मान्यता द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना पित्रोदा यांनी भारत-चीन संबंधांवर ठाम मत मांडले. ते म्हणाले की, भारताने मानसिकता बदलणे आवश्यक आहे व चीनला शत्रू मानण्याचा विचार थांबवावा लागेल.भारताची दृष्टीकोण सुरुवातीपासूनच संघर्षात्मक राहिला आहे. अशी मानसिकता शत्रू निर्माण करते, ज्यामुळे देशात काही प्रमाणात समर्थन मिळतेआपल्याला या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. चीनला शत्रू मानण्याचा विचार बदलावा लागेल. चीनसोबतच हे सर्व देशांसाठी आहे.

मला चीनकडून कोणता धोका आहे हे माहिती नाही. मला असं वाटतं की हा मुद्दा बहुधा अतिशयोक्त पद्धतीने मांडला जातो. कारण, अमेरिकेला नेहमीच एक शत्रू दाखवण्याची सवय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपच्या टीकेला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी उत्तर दिले आहे. जयराम रमेश यांनी ‘सॅम पित्रोदांचे चीनबद्दलटे मत निश्चितच काँग्रेसचे विचार नाहीत’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.